चक्रीवादळ ‘दिटवाह’ मुळे महाराष्ट्रात ईथे पाऊस.
सध्या चर्चेत असलेले ‘दिटवाह’ नावाचे चक्रीवादळ सध्या श्रीलंकेच्या भागात सक्रिय आहे. या प्रणालीमुळे श्रीलंकेत आधीच जोरदार किंवा अतिवृष्टीसारखा पाऊस झाला आहे. सध्या हे चक्रीवादळ जमिनीवर असल्यामुळे त्याला जास्त बळकटी मिळत नाहीये, आणि अरबी समुद्राकडून येणारे काही कोरडे वारेही या प्रणालीपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे सध्या ढगाळ वातावरण कमी झालेले दिसत आहे. ही प्रणाली हळूहळू उत्तरेकडे सरकत आहे आणि सध्या याचा वाऱ्याचा वेग सुमारे ३५ नॉट्स आहे.
उत्तर दिशेने सरकत असताना या प्रणालीची तीव्रता थोडी वाढण्याची शक्यता आहे, आणि वाऱ्याचा वेग ४० नॉट्सपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, जसे जसे हे चक्रीवादळ पुन्हा उत्तरेकडे जाईल, तसतशी त्याची तीव्रता कमी होईल. हवामान अंदाजानुसार, ३० नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत ही हवामान प्रणाली ‘डीप डिप्रेशन’ किंवा ‘डिप्रेशन’ च्या स्वरूपात चेन्नईच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा सध्या कोणताही विशेष प्रभाव दिसत नाही. राज्याच्या बहुतांश भागात, ज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ यांचा समावेश आहे, तापमान १२ ते १५ अंश सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर कोकण भागात तुलनेने जास्त तापमान असेल. पावसाचा विचार केल्यास, आज (२८ नोव्हेंबर) किंवा उद्या (२९ नोव्हेंबर) पावसाची शक्यता नाही. हवामान विभागाने ३० नोव्हेंबर रोजी चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे, पण ती शक्यता कमी आहे.
१ डिसेंबर रोजी गडचिरोलीतील हेपल्ली, हेरी, सिरोंचा, आणि भामरागड यांसारख्या दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. इतर ठिकाणी पावसाची विशेष शक्यता नाही आणि झालेला पाऊसही मुसळधार स्वरूपाचा नसेल.








